मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र म्हणून न लढता आपण स्वबळावर लढू. ठाकरे बंधुंशी युती केल्यास फक्त त्यांना फायदा होईल, काँग्रेसला त्याचा तोटा होतो, असे मत मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी एकमुखाने मांडले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांताक्रुझमधील गॅलेक्सी हॉटेलमध्ये काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि ज्योती गायकवाड हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेसाठीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.
या बैठकीत मुंबईतील काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी एकमुखाने निवडणुकीसाठी एकला चलो रे ची भूमिका मांडली. सर्व नेत्यांकडून मुंबई महापालिकेसाठी स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी रेटण्यात आली. तसेच काँग्रेसने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत नो कॉम्प्रोमाईज धोरण अवलंबल्याची माहिती आहे. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु असली तरी त्यासाठी महाराष्ट्रातील नेते फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस एकला चलो रेच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसला ठाकरे बंधुंसोबत युती का नको?
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा शिवसेना ठाकरे गटाला फायदा होतो. मात्र, आपल्याला ठाकरे गटाच्या व्होटबँकेचा फायदा होत नसल्याचे मत काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीत मांडले. तसेच ठाकरे बंधुंना सोबत घेतल्यास अल्पसंख्याक मतदार काँग्रेसपासून दूर जातात. याउलट शिवसेनेला युतीचा अधिक फायदा होत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीत सांगितले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत नसावी. काँग्रेसने पूर्ण ताकदीने जोर लावून लढावे, असे काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.